धाबे दणाणले : उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई धारणी : गडगा सिंचन प्रकल्पावर एक ब्रास रेती रॉयल्टीच्या अधिकृत पासवर दोनवेळा क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक करणारे १६ ओव्हरलोड ट्रॅक्टर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी जप्त करून दंडाची कार्यवाही सुरू केल्याने अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. धारणी तालुक्यात सध्या अवैध रेती तस्करीला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून येथील उपविभागीय अधिकारी व्ही.आर. राठोड यांनी अवैध रेती तस्करांविरूध्द कठोर पावले उचलली आहेत. गडगा सिंचन प्रकल्पासाठी ५० हून अधिक ट्रॅक्टरद्वारे क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती एसडीओंना मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाई करून ओव्हरलोड अवैध रेतीचे १६ ट्रॅक्टर जप्त केले व दंडात्मक रक्कम वसूल करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. यामुळे येथील रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. गडगा प्रकल्पावर रेती वाहतूक करणारे १६ ओव्हरलोड ट्रॅॅक्टर जप्त करून अभियंत्यांव्दारे रेतीची मोजणी करुन दंडाची कारवाई केली जाईल. एका रेती रॉयल्टी पासवर दोनवेळा रेती आणल्याास फौजदारी कार्यवाही व रेती खदानीवर देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. - व्ही.आर. राठोड, उपविभागीय अधिकारी, धारणी.‘लोकमत’च्या वृत्ताची दखलदोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने गडगा सिंचन प्रकल्पावर अवैध रेती साठवणूकप्रकरणी महसूल विभागाने ३७ लाखांच्या दंडातून सहा लाखांचा दंड वसूल केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुध्द धडक सिंचन मोहीम सुरू केली आहे.
अतिभार रेती वाहतूक करणारे १६ ट्रॅक्टर जप्त
By admin | Updated: September 17, 2015 00:09 IST