अमरावती : सौम्य लक्षणांच्या भीतीतून लोक मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत. अशा रुग्णांसाठी शहरात कोविडबाह्य रुग्णसेवा केंद्रांची नितांत आवश्यकता असून, त्यावर तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी माजी आमदार सुनील देशमुख व भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी संयुक्त पत्रपरिषदेतून केली.
सध्याच्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्गात वाढ झाली असून, लोकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येताच सौम्य लक्षणे असलेले लोकही पुढच्या दोन-चार दिवसांत प्रकृती ढासळू नये म्हणून स्वतःला रुग्णालयात दाखल करून घेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी अतिशय आवश्यक असलेल्या गरजू रुग्णांना बेड उपलब्ध राहत नाहीत. अशावेळी होम क्वारंटाईन असलेल्या असंख्य रुग्णांच्या मनात भीती निर्माण झाली किंवा थोडा त्रास वाढला, तर त्याने कुठे धाव घ्यावी, ही गंभीर समस्या बनलेली आहे. कोविड रुग्णालयांशिवाय सौम्य लक्षणे असलेल्या, होम क्वारांटाईन असलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक शहरात विविध भागात कोविड ओपीडी सुरू झाल्यास रुग्णांच्या मनात असलेली भीती दूर होईल. कोविडवर उपचार करणारा डॉक्टर आपल्यासाठी उपलब्ध आहे, हा विश्वास निर्माण होईल. परिणामी चाचणी टाळणारे लोकदेखील चाचणी करून घेतील आणि संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल, असे देशमुख आणि कुळकर्णी म्हणाले.
पत्रपरिषदेला भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र खांडेकर, शहर सरचिटणीस गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताळे उपस्थित होते.