२० अधिकारी, ६३ कर्मचाऱ्यांचा सहभाग : नाकाबंदीत ३७ वाहनांवर कारवाईअमरावती : शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने रविवारी मध्यरात्री सुद्धा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या नेतृत्वात ‘आॅल आॅऊट आॅपरेशन’ राबविण्यात आले. यावेळी नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी १५६ वाहनांची तपासणी करून नियमबाह्य वाहन चालविणाऱ्या ३७ जणांवर कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी रात्री पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, विवेक पानसरे यांच्या नेतृत्वात सर्व ठाण्यातील पोलीस निरीक्षक व ५०० पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘आॅल आॅऊट आॅपरेशन’मध्ये भाग घेतला. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची तपासणी, रेकार्डवरील गुन्हेगारांची चौकशी, अवैध व्यावसायिकांच्या ठिकाणांची झडती आदी गुन्ह्यांसबंधीची तपासणी व चौकशी केली. रविवारी मध्यरात्री सुद्धा पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे ‘आॅल आॅऊट आॅपरेशन’ चालविण्यात आले. यामध्ये २० पोलीस अधिकारी व ६३ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. हॉटेल, लॉज, रेस्टॉरेंट धाब्यांची तपासणी करण्यात आली. यामोहिमेत पोलिसांनी रेकॉर्डवरील २८ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यामध्ये खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत राहणारा गुन्हेगार भोला भिमराव मोरे (२२) या विनाकारण भटकताना आढळून आला. पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन मुंबई पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. त्याचप्रमाणे वॉरंटमधील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. दिवाळीपर्यंत चालणार कारवाई अमरावती :नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटे टाऊनशिपजवळील साई संतोषी धाब्याची पोलिसांनी तपासणी केली असता तेथे दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी धाब्यावरील पाच जणांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. ही मोहीम दिवाळीच्या अनुषंगाने आणखी काही दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी विजयादशमीच्या दिवशी बच्छराज प्लॉटमधील जुगार अड्ड्यावर धाड घालून जुगाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आणि अधिनस्त यंत्रणेने मोहीम हाती घेतली आहे.
रविवारी मध्यरात्रीही चालले ‘आॅल आऊट आॅपरेशन’
By admin | Updated: October 25, 2016 00:07 IST