फोटो -
पान ३ ची लिड
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यात फळगळीने संत्राउत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. कुठे कमी, तर कुठे अधिक ही फळगळ आहे. यातच काही संत्राउत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे फळासकट उभी वाळत आहेत. मर रोगामुळे ही झाडे सुकत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अचलपूर तालुक्यातील काकडा, इसापूर, श्यामपुर, शिंदी बु., हनवतखेडा, दर्याबाद यांसह अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात मर रोग बघायला मिळत आहे. यात आंबिया बहराच्या संत्राफळांनी लदबदलेली हिरवीकंच झाडे जागेवरच फळासकट सुकली आहेत.
तालुक्यातील अनेक भागात संत्रा झाडावरील फळगळ आजही सुरू आहे. काही भागात माशीचा प्रादुर्भावही आढळून आला आहे. यात संत्राउत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
कृषी विभाग बघ्याच्या भूमिकेत
संत्राउत्पादक शेतकरी आणि संत्राबागा संकटात सापडल्या असतानाही कृषी विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. फळगळ आणि मर रोग व संत्र्यावरील अन्य संकटांविषयी कुठलेही परिणामकारक मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाने पोहचविले नाही. या फळगळीची किंवा मर रोगाची साधी दखलही कृषी विभागाला घ्यावीशी वाटली नाही.
कृषी अधिकारी नॉट रिचेबल
फळगळ आणि मर रोगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मागील दोन दिवसांपासून ते फोन उचलत नाहीत. ‘आय विल कॉल यू लेटर’ असा मेसेज ते टाकत असले तरी त्यांनी दोन दिवसांमध्ये परत फोन केलेला नाही.
बदली करून घेण्यात व्यस्त
प्राप्त माहितीनुसार, अचलपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी माती परीक्षण विभागात बदली करून घेण्यास फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. तेथेही दोन अधिकारी इच्छुक आहेत. या दोघांपैकी एकाची राज्यमंत्र्यांनी, तर दुसऱ्याची कॅबिनेट मंत्र्यांनी शिफारस केली आहे. यात कोणाचे पारडे जड पडते, याकडे कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.