लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्र्याला भाव नसल्याने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असून, २०० रुपये क्रेटने शेतकऱ्यांचा संत्रा विक्री होत आहे. यंदा संत्र्याची फळगळ अक्षरश: ३५ ते ५० टक्क्यांवर पोहोचली आहे.मोर्शी तालुक्यातील घोडदेव, सालबर्डी, पाळा, दापोरी, हिवरखेड, बेलोना, उमरखेड, भिवकुंडी, मायवाडी, भाईपूर, अंबाडा, सायवाडा, या भागात मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादित होतात. मात्र, यावर्षीच्या सुरुवातीला लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील संत्र्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मृग बहराचा संत्रा फुटला नसल्याने संत्रा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळ झाली. ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली. परिणामी, तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे.यावर्षी अतिपावसामुळे फळांवर काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. १० हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने संत्रा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. परराज्यातील बाजारपेठांमध्ये संत्र्याला उठाव नसल्याचे व्यापारी शेतकऱ्यांना सांगत आहेत.आशेवर फेरले पाणीयंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादकांना होती. संत्रा उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, संत्र्याच्या गळतीमुळे, संत्रा झाडाची पानगळ, कोरोना या सर्व संकटांमुळे हवालदिल झाला. ऐन तोडणीला येताच् संत्र्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. एकीकडे विविध संकटे तर दुसरीकडे संत्र्याला मिळणार अत्यल्प भाव, अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, यामुळे बळीराजाच्या हातात आलेला तोंडचा घास हरवल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
विदर्भातील संत्रा उत्पादक कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर; भाव १० ते १५ रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:22 IST
Amravati News मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्र्याला भाव नसल्याने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
विदर्भातील संत्रा उत्पादक कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर; भाव १० ते १५ रुपये किलो
ठळक मुद्देसंत्र्याची फळगळ ३५ ते ५० टक्क्यांवर