पोळ्याच्या करीवर करडी नजर : वन्यपशुंची शिकार रोखलीअमरावती : मांसाहार करणाऱ्यांसाठी पोळ्याची कर ही पर्वणीच ठरते. मात्र शेळी, बोकड व कोंबड्यांचे मांस महाग असल्यामुळे हरिण, मोर आणि नीलगाईचे मांस सेवन करण्याला खवय्ये प्राधान्य देतात. परंतु वन्यपशुंचीे शिकार होऊ नये, यासाठी वनकर्मचाऱ्यांनी शनिवारी जंगलात रात्र जागून काढली. ‘सर्च आॅपेरशन’ अभियानामुळे वन्यपशुंची शिकार रोखण्यात वनविभागाला यश आले.श्रावण आटोपताच पोळा कर येत असल्याने मौन धारण केलेल्या मांसाहारींनी या दिवसाचे नियोजन चालविले होते. मद्यप्राशन आणि मांस सेवनाचे नियोजन करताना बोकड, कोंबडीचे मांस महागडे असल्यामुळे वन्यपशुंचे मांस सेवन करण्याला प्राधान्य देतात. सण, उत्सवाचे औचित्य साधून शिकारी वन्यपशुंची शिकार करतात. जंगलात वन्यपशुंची शिकार ही गावठी बॉम्ब, बंदुकीने शिकारी करतात. वन्यपशुंचे मांस हे ठरावीक स्थळी विकले जाते. यावर्षी वन्यपशुंची शिकार होऊ नये, यासाठी उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या आदेशानुसार ‘सर्च आॅपरेशन’ राबविण्यात आले. वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांच्या नेतृत्त्वात पोहरा, बोडणा, भानखेडा, अंजनगाव बारी, महादेव खोरी, छत्री तलाव परिसरातील जंगल पिंजून काढले. दरम्यान ढाबे, हॉटेलची तपासणी करण्यात आली. शनिवारची रात्र वनकर्मचाऱ्यांनी जंगलात घालविली. संशयितांची तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
वनकर्मचाऱ्यांचे जंगलात ‘सर्च आॅपरेशन’
By admin | Updated: September 14, 2015 00:09 IST