विभागीय आयुक्त कार्यालयावर ठिय्या : १ जानेवारी रोजी लेखणीबंदचा इशारा अमरावती : नायब तहसीलदारांना शासनाने राजपत्रित वर्ग - २ चा दर्जा दिला. मात्र वेतन दिले नाही. त्यामुळे अमरावती विभागातील ५०० हून अधिक तहसीलदार व नायब तहसील तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी गुरुवारी एक दिवसीय रजा आंदोलन करून विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या दिला. महसूल विभागातील नायब तहसीलदारांना १३ नोव्हेंबर १९९८ चे शासन निर्णयान्वये राजपत्रित अधिकारी वर्ग - २ अधिकारीपदाचा दर्जा देण्यात आला. त्यावेळी नायब तहसीलदारांचे वेतन ५,५०० या श्रेणीत होते व इतर समकक्ष राजपत्रित अधिकाऱ्यांचे वेतन ६५०० या श्रेणीत होते. शासनाने राजपत्रितचा दर्जा दिला. मात्र, वेतनश्रणी अद्यापही दिलेली नाही. यासंदर्भात ५ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव (महसूल) प्रधान सचिव (वित्त) यांच्या समवेत बैठकीदरम्यान नायब तहसीलदारांचे ग्रेड वेतन ४३०० वरून ४६०० रुपये करण्याविषयी चर्चा करण्यात आली. शासनाने तत्वत: मान्यता दिली. परंतु अद्यापही पुढील कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ही मागणी पूर्वलक्षी प्रभावाने देय होईस्तोवर संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय सदस्यांनी एकमताने घेतला. त्याअन्वये संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश बगळे, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास महसूल कर्मचारी संघटना व विभागीय मंडळ अधिकारी संघटनेनी पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)
तहसीलदारांचे एक दिवसीय रजा आंदोलन
By admin | Updated: December 12, 2015 00:12 IST