शहरातील युवकांमध्ये क्रेझ, ‘कस्टमर’ वाढले
परतवाडा : शहराला लागून असलेल्या कांडली परिसरात गांजाची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या डीबी पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईनंतर पुन्हा उघड झाले. एका घरात एक किलो गांजा आढळून आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. कठोर संचारबंदीच्या कालावधीत गांजा आला कोठून हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे जुळ्या शहरातील शाळा-महाविद्यालयांतील युवकांमध्ये गांजा सेवनाची सवय पालकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
अंसार खान इसराईल खान (३२, रा. नाईक प्लॉट, कांडली) असे गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ठाणेदार सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक नीलेश देशमुख, उपनिरीक्षक मनोज कदम, सहायक उपनिरीक्षक मोहन मोहोळ, जयसिंह चव्हाण, दीपक राऊत, गणेश बेलोकार, प्रांजल फाटकर, विवेक ठाकरे, शुभम मार्कंड यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीवरून आरोपी अन्सार खान इसराईल खान याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, बैठकीतील कपाटातून एका थैलीत १ किलो ३९८ ग्रॅम ओलसर गांजा आढळला. २१ हजार रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
बॉक्स
शहरातील युवा गांजाच्या धूम्रवलयात
शहरातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात युवा गांजा सेवन करीत असल्याचे अनेकदा पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे. पालकांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. नोकरदार पालकांचे अनेक युवक चोरी आणि लूटपाट करून आपला हा शौक पूर्ण करीत असल्याचा प्रकार उघड झाला. सुशिक्षित वर्गासाठी ही चिंतेची बाब आहे.
बॉक्स
येथ चोरून लपून विक्री आणि दम मारो
परतवाडा, अचलपूर शहरासह लागून असलेल्या कांडली परिसरात अंबाडा रोड, कविठा स्टॉप व रोड गिड्डी अमराई, झोपडपट्टी परिसर, नाईक प्लॉट, कविठा स्टॉप, मुघलाई, परेड ग्राऊंड, आठवडी बाजार, इंदिरा पार्क, पोस्ट ऑफिस परिसर, रविनगर, पाणी टाकी, लालपूल, सार्वजनिक बांधकाम विभागामागचा झुडपी जंगल परिसर अशा अनेक ठिकाणी विक्री आणि आडोसा पाहून गांजा चिलीम व सिगारेटमध्ये भरून नशा केला जातो.
बॉक्स
पाचशे, अडीचशे आणि दीडशेला पुडी
गांजाची विक्री तीन प्रकारच्या पुड्यांमधून होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाचशे, अडीचशे व दीडशे रुपये किमतीच्या या पुड्या वेगवेगळ्या ‘टक’ पुरवितात. दीडशे रुपयांच्या पुडीत तीन ‘टकी’ होतात. पिणाऱ्यांच्या संख्येवर किंमत अवलंबून राहते.
कोट
कांडली परिसरात माहितीवरून घरातून गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांची अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू असून, पालकांनीसुद्धा आपल्या मुलांची दिनचर्या आणि संगत पाहून वाईट मार्गाने जात आहे का, यावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा