फोटो पी १० एकदरा
वरूड : तालुक्यातील एकदरा येथील नागमोते लेआऊटमध्ये शनिवारी दुपारी दोन वाजता दरम्यान आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करून एकापाठोपाठ सात गोठे भस्मसात केले. यामध्ये एक कालवड ठार झाली, एक कालवड गंभीररीत्या जळाली.
गोठ्यातील सर्व जनावरे बाहेर निघाल्याने अनर्थ टळला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत राजेश पावडे यांच्या गोठ्यातील कालवड जळून ठार, तर एक कालवड होरपळली. वासुदेव राऊत, वासुदेव व-हेकर, रामकृष्णा चौधरी, रवि ठाकरे, प्रकाश चौधरी, अशोक राऊत, मनोहर मांडे यांचे गोठे जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे शेतीपयोगी साहित्य व जनावरांच्या चाऱ्याची राखरांगोळी झाली. घटनेची माहिती मिळताच वरूड व शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. यामुळे संभाव्य अनर्थ टळला. तत्पूर्वी गावकऱ्यांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी आमदार देवेंद्र भुयार, ऋषिकेश राऊत, तहसीलदार किशोर गावंडे, ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी घटना स्थळावर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.