शिवनीत शेतकऱ्यांचा चक्का जाम : शेतमोजणीचा प्रयत्न हाणून पाडलाशिवनी रसुलापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आम्हाला जमीन द्यायची नाही, अशी भूमिका शिवनी गावातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'मध्ये सामील असलेल्या या महामार्गासाठी अधिकारी जमिनीची मोजणी करीत आहेत. मात्र अधिकाऱ्यांचा शेतजमीन मोजण्याचा प्रयत्न हाणून पाडत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. अमरावती-यवतमाळ महामार्गावर चक्काजाम केल्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागले. समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी अधिकारी पोलिसांच्या ताफ्यासह शिवानीत दुपारी १ वाजताच्या सुमारास दाखल झाले. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच लोकांची गर्दी झाली. अधिकाऱ्यांनी हरिदास लिचडे व गजानन राजकुळे यांच्या शेताची मोजणी सुरू केली. याचवेळी शेतकऱ्यांच्या विरोधास प्रारंभ झाला. आमची जमीन मोजण्याआधी आमची परवाणगी घेतली काय, असा सवाल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांस केला. दरम्यान गावातील महिला-पुरुषांनी एकत्र येत शिवनीच्या बसस्थानकावर शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम केला. विरोध वाढत आहे असे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी माघारी परत येण्याचे ठरविले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पालवे, उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ, तलाठी गजानन बिंदवाल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमची जमीन समृद्धी महामार्गासाठी देणार नाही त्यामुळे शेतजमिनीच्या मोजणीसाठी बळजबरी करू नये अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या आंदोलनात भानुदास मंदुरकर, मधुकर कोठाळे, माधव ढोके, मोरेश्वर वंजारी, विजय चिंचे, विनोद वैद्य, गजानन राजमुळे, रघुपती गावंडे, संतोष वैद्य, उमेश मदुरकर, अमोल राजमुळे, राजेंद्र आगळे, अंकुश वैद्य, उमेश बुरे यांच्यासह शेकडो गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
अधिकारी आल्यापावली परतले !
By admin | Updated: March 8, 2017 00:12 IST