नांदगाव खंडेश्वर : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील गौरखेडा गावाला बुधवारी भेट दिली. यावेळी तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, ठाणेदार हेमंत ठाकरे, आरोग्य विस्तार अधिकारी कमल धुर्वे, दुर्गा खंडारे, आरोग्यसेवक सुरेश बारबुदे, आरोग्य सहायक राजू मेश्राम, तलाठी प्रीती कराळे, पोलीस पाटील प्रदीप चव्हाण यांच्या पथकाने येथील कंटेनमेंट झोनची पाहणी केली.
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाच्या घरांना भेटी देऊन पाहणी केली. या गावात २४ एप्रिल रोजी कोरोना चाचणी कॅम्प घेण्यात आला होता. त्यावेळी तेथे ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर या गावाची सीमा सील करण्यात आली होती. तरीही रुग्ण संख्या वाढल्याने या गावाला अधिकाऱ्यांनी भेट देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व त्रिसूत्रीचे पालन करावे, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.