लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात नियमितपणे लसींचा पुरवठा होत नसल्याने नेहमीच अर्धेअधिक केंद्र बंद राहतात. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेचा बोजवारा उडाला आहे. सद्यस्थितीत लोकसंख्येच्या तुलनेत २२.२४ टक्के लसीकरण झालेले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार ३२३ झालेली आहे तर मृत्यू १,५५८ झालेले आहे. यामध्ये दर ३० नागरिकांमागे एक व्यक्ती कोरोनाग्रस्त झालेला असल्याचे वास्तव आहे. अशावेळी कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण हा प्रमुख उपाय आहे. मात्र, यात पुरवठ्याचा खोडा आहे. जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आतापर्यंत अर्धाच लसींचा साठा मिळाल्याने ही मोहीम नियमित राहत नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली व पाच टप्प्यांमध्ये लसीकरण होत आहे. आतापर्यंत ७,८९,३३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत ६,९६,८४० डोस प्राप्त झालेले आहेत. यात ५,४१,३३० कोविशिल्ड, तर १,५५,५१० कोव्हॅक्सिनचा समावेश आाहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत साधारणपणे ११० लसीकरण केंद्रे आहेत.
असे आहे टप्पानिहाय लसीकरण जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर ३५,४६६, फ्रंटलाईन वर्कर ५६,१६२, याशिवाय १८ ते ४४ वयोगटात १,१८,५८१, ४५ ते ५९ वयोगटात २,४२,४२४ व ६० वर्षांवरील २,५५,१६२ ज्येष्ठ नागरिकांमध्ये आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे. लसींचा नेहमीच तुटवडा राहत असल्याने अमरावती, अचलपूर व वरूड तालुक्यातील केंद्रांवर पहाटेपासून रांगा असल्याचे चित्र आहे.
लसीकरणात पुरुषच आघाडीवररविवारपर्यत झालेल्या लसीकरणात पुरुषच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यामध्ये ३,७६,१६८ पुरुष व ३,२९,७७० महिलांचे लसीकरण झालेले आहे. याशिवाय ७५ तृतीय पंथीयांचे लसीकरण झालेले आहे. अमरावती शहरात १,५६,९१४ पुरुष व १,३५,७५० महिला, वरूड तालुक्यात ३१,३४० पुरुष व २८,६५२३ महिलांचे लसीकरण झालेले आहे.