लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील गाडगेनगर भागातील एका महिलेवर 'डिजिटल अरेस्ट' करून तब्बल १७ लाख २० हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ ते २६ ऑगस्टदरम्यान घडलेल्या या फसवणुकीत सायबर भामट्यांनी महिलेला व्हिडिओ कॉलद्वारे अटकेची भीती दाखवत तिच्याकडून रक्कम उकळली. महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक व आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
याप्रकरणी सुजाता नामक महिलेच्या तक्रारीनुसार, १९ ऑगस्टला या महिलेला मुंबई कुलाबा पोलिस असल्याचे भासवत एका व्यक्तीने फोन केला. तुमच्या आधार कार्डवरून घेतलेल्या सीमवरून अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर पोलिसी वेशातील भामट्याने बनावट कागदपत्रे दाखवत अटकेची भीती दाखविली. अटकेच्या भीतीमुळे महिलेने सायबर भामट्यांच्या खात्यात वेगवेगळ्या प्रकारे एकूण १७ लाख २० हजार २३० रुपये पाठविले. रक्कम गमावल्यानंतर मात्र त्यांना फसवणुकीची जाणीव झाली.
गोल्ड लोन घेतले, एफडीही मोडलीसायबर भामट्यांनी महिलेला गोल्ड लोन देणाऱ्या फायनान्स कंपनीकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यास प्रवृत्त केले. गोल्ड लोन मिळाल्यानंतर काही क्षणांतच ती रक्कम सायबर भामट्यांनी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करवून घेतली. महिलेने एफडी मोडून ती रक्कमही अटक टाळण्यासाठी सायबर भामट्यांना पाठविली.
मुलगा दुबईला, त्याला अटक होईल
- सायबर भामट्याने फिर्यादी महिलेची आर्थिक पार्श्वभूमी समजून घेतली. रोख आहे का, अशी विचारणा केली. सोन्याचे काही दागिने व एफडी असल्याचे महिलेकडून जाणून घेण्यात भामटे यशस्वी ठरले.
- फिर्यादीचा मुलगा दुबईला नोकरी करीत असल्याचे जाणून घेतले. आरोपींनी महिलेसह तिच्या दुबई येथील नोकरदार मुलाच्या अटकेची भीती दाखविली. त्यामुळे महिलेची घाबरगुंडी उडाली.
१९ ते २६ ऑगस्टदरम्यान तो डिजिटल अरेस्टचा प्रकार घडला. महिलेने काढलेले गोल्ड लोन थेट सायबर भामट्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाले. यात अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणूक व आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. नागरिकांनी डिजिटल अरेस्टला बळी पडू नये.अनिकेत कासार, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर.