(फोटो आहे)
अमरावती : राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले पोषण माह अभियान आता घराघरात चुलीपर्यंत पोहोचल्याचे पाहून समाधान झाल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. यावर्षीही देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील वातोंडा रहिमतपूर आणि वाकी रायपूर या दोन गावातील अंगणवाड्यांना भेट देऊन पोषण माह अभियानाचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे, याचा आढावा ना. यशोमती ठाकूर यांनी घेतला. यावेळी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधत त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि त्याला मिळणारा गावकऱ्यांचा प्रतिसाद याबाबत माहिती करून घेतली. अंगणवाडी सेविकांना गावातून मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम असून हे अभियान आता प्रत्येक घरातील चुलीपर्यंत पोहोचेल, याची ग्वाही अंगणवाडी सेविकांनी दिली आहे. त्यासंदर्भात केलेल्या कामकाजाची आकडेवारी, शून्य ते सहा वयोगटातील मुलांची नोंद, गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आहाराविषयी ठेवलेल्या नोंदी आणि घेतलेली काळजी यासोबतच सकस आणि चौरस आहाराचे महत्त्व गावकऱ्यांना कशा पद्धतीने पटवून दिले जात आहे, याचे प्रात्यक्षिकच या अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांसमोर सादर केले. या अभियानाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहतात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणि राज्यात अमरावती जिल्हा पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांसमोर बोलून दाखवला. यावेळी परसबागेचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून देत त्यांच्यापर्यंत परसबागेचे किट आणि काही झाडांची रोपे अंगणवाडी सेविकामार्फत पोहचवण्यात आली संपूर्ण आणि सकस आहार हाच निरोगी आयुष्याचा मूलमंत्र असल्याचे यावेळी पटवून देण्याचा प्रयत्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे. या दोन अंगणवाड्यांप्रमाणेच जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रत्येक अंगणवाडीत पोषणाचे महत्त्व सांगितले जात असून ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या पोषण माह अभियानांतर्गत सर्व ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या सगळ्याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा राज्य पहिल्या क्रमांकावर या अभियानात नक्की येईल, असा विश्वास पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
000