भातकुली : घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्प, धारणी व भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना कोरोनाकाळात स्वास्थ्य सुरक्षिततेसाठी आहारविषयक उपायांवर ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
या ऑनलाईन प्रशिक्षणातून सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणारे जीवनसत्त्व आणि त्यांच्या स्रोतांचे महत्त्व सांगण्यात आले. यात धारणी आणि भातकुली तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. गृहविज्ञान विशेषतज्ज्ञ प्रणिता कडू यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीरात आवश्यक असणारे प्रमुख जीवनसत्त्व, त्यांचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. शरीराची प्रतिकारशक्ती आणि संरक्षण देण्यासाठी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. मात्र, बहुतांश जीवनसत्त्वे शरीरात तयार होत नसल्याने ती दैनंदिन आहारातून घेणे गरजेचे आहे. या जीवनसत्वांची सहज उपलब्धता आणि स्वस्त स्रोत सांगून त्यांनी अंगणवाडीच्या परसबागेत घेता येणाऱ्या पालेभाज्या, फळझाडांची माहिती दिली. लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे अ आणि क, आवश्यक असणारे प्रथिने, तसेच यांच्या अभावामुळे शरीरावर होणारे परिणाम, जीवनसत्त्वाचे फायदे आणि विविध घरगुती स्रोतांबाबत माहिती दिली. तसेच प्रत्येक जीवनसत्त्वांचे योग्य शोषण व्हावे, यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. धारणी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण आणि भातकुली येथील बालविकास प्रकल्प अधिकारी भस्मे यांनीही प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.