अमरावती : राज्यात मुंबईनंतर अमरावती येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा योजना प्रसिद्ध आहे. आता ही योजना महापालिकेच्या ताब्यात येणार असून त्याअनुषंगाने आयुक्त गुडेवार यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. सात कोटी रूपयांनी नफ्यात असलेली ही योजना लवकरच महापालिकेच्या ताब्यात जाण्याचे संकेत आहेत.शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जीवन प्राधिकरणच्या ताब्यातील पाणी पुरवठा योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात देण्याची मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार येथील पाणी पुरवठा योजना महापालिकेच्या ताब्यात येईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. योजना ताब्यात घेण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मान्य करुन तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. अमरावती शहराची ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात निवड झाल्यानंतर नागरिकांना स्मार्ट सुविधा देण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. २४ तास पाणीपुरवठा करण्याचा निकष ‘स्मार्ट सिटी’साठी असल्याने तो पूर्ण करावाच लागेल. त्यादृष्टीने योजना हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.घर तेथे नळ 'कनेक्शन'शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरी नळ कनेक्शन अनिवार्य असेल. २४ तास पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक नळ बंद केले जातील. त्यानंतर झोपडपट्ट्यांमध्ये सर्वांना नळ कनेक्शन दिले जाईल, असे आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले. नवबौध्द, अनुसूचित जातींना शासन अनुदानातून नळ 'कनेक्शन' दिले जात आहेत.पाणीपुरवठा योजना महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. ही योजना नफ्यात असून ती ताब्यात घेण्यास काहीही अडचण नाही. सभागृहाच्या ठरावानंतर हालचाली वेगाने सुरू होतील.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.
आता महापालिकाच करणार पाणी पुरवठा
By admin | Updated: August 8, 2015 00:11 IST