अमरावती : स्वस्त धान्य पुरविणारी रेशन दुकाने लवकरच नागरिकांना विविध सेवा पुरविणारी केंद्र बनणार आहेत. या दुकानांमधून बायोमेट्रिक पद्धतीने धान्य देण्याबरोबरच या मशिनव्दारे नागरिकांना अन्य सुविधाही देणार आहेत.सध्या या बायोमेट्रिक यंत्रणेचे अन्य कोणकोणते उपयोग करुन घेता येतील याबाबत वरिष्ठ स्तरावर विचार विनिमय सुरु आहेत. राज्यभरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त धान्याच्या दुकानांमधून रेशनवरील धान्य व केरोसीनचे वितरणाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यापूर्वी यामध्ये अनेक गैरप्रकार झाले आणि नागरिकांना वेळेत व पुरेसे धान्य किंवा रॉकेल मिळत नाही, अशा हजारो तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर करुन रेशनवरील धान्य व केरोसीनचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणाही केली आहे. या घोषणेनंतर या योजनेची पूर्वतयारी सुरू असून सर्व दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याव्दारे खऱ्या लाभार्थ्यांनाच धान्य व केरोसीन मिळू शकेल. त्यासाठी योग्य यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या हा प्रयोग सिंधूदुर्ग व रायगड या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. याव्दारे धान्य रॉकेलचे वितरण येथे सुरू होत आहे. यामध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पध्दतीने ओळख पटविण्याबरोबरच अन्य सुविधाही उपलब्ध करुन दिली जाईल. त्यामुळे नागरिकांना वीज बिले भरण्याची सुविधाही होणार आहे. या सेवा पुरविण्याच्या बदल्यात त्यांना नागरिकांकडून काही मोबदलाही घेता येणार आहे. स्वस्त धान्य पुरविण्यातील कमिशन कमी असल्याची तक्रार करुन ते वाढविण्याची मागणी या दुकानदारांकडून करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक पध्दतीने या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी या सुविधांमध्ये भविष्यात शासनाकडून भर टाकण्यात येणार आहे. उद्देश काय ?बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटविण्यासोबतच नागरिकांना विविध सुविधा देण्यात येणार आहे. वीज बिल भरण्याची सुविधा केंद्रात मिळणार. सेवा पुरविण्याच्या बदल्यात नागरिकांकडून मोबदला घेण्याचा निर्णय बायोमेट्रिक यंत्रणेव्दारे धान्य, केरोसीनचे वितरण सध्या कोकण विभागात सुरू आहे.
आता स्वस्त धान्य दुकानांतही वीज बिल भरण्याची सुविधा !
By admin | Updated: April 23, 2015 00:05 IST