जितेंद्र दखने
अमरावती: कोरोनाचा वाढता संसर्ग महाराष्ट्रात अधिक वाढत असल्याने आता मध्यप्रदेशच्या परिवहन विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना नो एण्ट्री केली आहे. यासोबतच खासगी बसेनासुद्धा मनाई केली आहे. याबाबत मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्यात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसगाड्यांना ३१ मार्च बंद ठेवण्याचा निर्णय मध्यप्रदेश राज्य परिवहन प्राधिकरणाच्या अपर परिवहन आयुक्तांनी जारी केला आहे. सदरचा आदेश येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात धडकला आहे.
सध्या राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मध्यप्रदेश परिवहन विभागाने महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी बसेसना मार्च अखेरपर्यंत नो एण्ट्री केली आहे. परिणामी, अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मध्यप्रदेशमध्ये धावणाऱ्या ३१ बसफेऱ्या तूर्तास बंद केल्या आहेत. यामध्ये अमरावती भोपाळ, मुलताई, बैतुल, बऱ्हाणपूर, खंडवा, छिंदवाडा आदी एसटी बसेसच्या फेऱ्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याचे स्थानिक विभाग नियंत्रक कार्यालयाच्या सूत्रांनी लाेकमतशी बोलताना सांगितले.
बॉक्स
परभणी, हिंगोलीत आउट गोईंग सुरू
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सध्या मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील अमरावतीमध्ये येणाऱ्या एसटी बसेसची प्रवासी वाहतूक बंद आहे; मात्र अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून परभणी व हिंगोली या ठिकाणी एसटी बसेसच्या फेऱ्या सुरू असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.
.