मार्डीकरांना सत्तेचा विश्वास : विरोधी पक्षनेते आक्रमक अमरावती : आचारसंहितेच्या सावटाखाली सोमवारी झालेल्या निरोपाच्या आमसभेत सत्ताधिशांसह विरोधकांनी केलेली फटकेबाजीने सभागृह दणाणून गेल होते. अवघ्या एका पानाची कार्यक्रमपत्रिका एका तासाच्या आत निकाली निघाल्यानंतर निरोपाचे भाषण सुरू झाले. यात अविनाश मार्डीकर विरुद्ध प्रवीण हरमकर आणि विलास इंगोलेविरुद्ध संजय अग्रवाल, अशी सत्ताधारी -विरोधकांची जुगलबंदी जुंपली. आचारसंहितेच्या सावटात सोमवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आमसभेला सुरुवात झाली. नगरसेवक मिलिंद बांबल यांच्या तीनही प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर आयुक्तांकडून आलेली चार प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यानंतर मिलिंद बांबल यांचा डॉ.भाऊसाहेबांची जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भातील प्रश्न आणि प्रकाश बन्सोड यांचा मधुचंद्र कॉलनीतील अभ्यासिकेच्या बांधकामाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ट नगरसेवक तथा माजी महापौर विलास इंगोले यांनी निरोपाचे भाषण सुरू केले. मागील २० वर्षांमध्ये जी विकासकामे झाली नाहीत ती पाच वर्षांते शक्य झालीत, त्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक, अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, अशी भूमिका इंगोले यांनी मांडली. पाच वर्षांत शहराचा चेहरामोहरा पालटल्याची भावना स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी व्यक्त केली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी याच सभागृहात काही भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली, असे सांगत पुढे असे प्रकार घडू नयेत, अशीही सूचना केली. त्यावर हरमकर आणि इंगोलेमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आम्ही पाच वर्षे जी विकासकामे केलीत ती जनतेसमोर आहेत. एलईडी असोत वा राजापेठ ओव्हरब्रीजचे काम आमच्या कार्यकाळात त्याला दिशा मिळाली. त्यामुळे वाऱ्याची दिशा कुठलीही असो किवा असो कुठलीही लाट आम्हीच सत्तेत येऊ, असा दृढविश्वास मार्डीकरांनी व्यक्त केला. त्याचवेळी हरमकरांकडे अंगुलीनिर्देश करीत विरोधीपक्ष होता तरी कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करणे विरोधीपक्षाची जबाबबदारी असताना विरोधी पक्ष नव्हताच, अशी कोपरखळी मार्डीकरांनी मारली. त्यावर तब्दील फी, फायबर टॉयलेट घोटाळा कुणी उघड केला, असे बजावण्याचा प्रयत्न हरमकर यांनी केला. त्यावेळी हरमकर आणि मार्डीकर यांच्यामध्ये खडाजंगी झाली. चेतन पवार, प्रकाश बन्सोड, प्रदीप दंदे, बबलू शेखावत आदींनी अभ्यासू मत मांडले. याखेरीज महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भूखंड देण्यात यावे, असा प्रस्ताव विलास इंगोले यांनी मांडला. मात्र पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांच्यासाठी ८६० घरांचा प्रस्ताव तयार असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाकडून मांडण्यात आली. (प्रतिनिधी) नगरसेवकांचे फोटोसेशन शेवटची आमसभा पार पडल्यानंंतर उपस्थित नगरसेवकांचे फोटो सेशन करण्यात आले. आयुक्त हेमंत पवार यांच्यासह ५४ पेक्षा अधिक नगरसेवकांनी सामूहिक छायाचित्रे काढून घेतलीत. यात ३२ महिला नगरसेविकांनी सहभाग घेतला होता. बांबलांनी सभागृह जिंकले स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती महापालिकेत दरवर्षी साजरी करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीचे माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक मिलिंद बांबल यांनी सभागृहात मांडला. याबाबत सभागृहाने त्यांची प्रशंसा केली. ‘लोकमत’चे अभिनंदन विदर्भात सर्वदूर भाऊसाहेबांचा जयंत्युत्सव साजरा होत असताना महापालिकेच्या राधानगरस्थित शाळेच्या आवारातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याची दुरवस्था ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडली. त्या वृत्ताचा आवर्जून उल्लेख करत ज्येष्ट सदस्य चेतन पवार ,मिलिंद बांबल,स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर,विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी पुतळा देखभालीचे भान प्रशासनाने ठेवावे, अशी सूचना प्रशासनाला केली. त्या भाऊसाहेबांच्या पुतळ्याची स्वच्छता करुन हारार्पण करावे, अशी पूरक सूचना बांबल यांनी केली. ती सुचना प्रशासनाकडून मान्य करण्यात आली. महापालिकेत भाऊसाहेबांचा जयंत्युत्सव महापालिकेत कृषीमहर्षी आणि जिल्ह्याचे सुपुत्र भाऊसाहेब देशमुख यांची जयंती दरवर्षी साजरी करण्यात यावी, असा प्रस्ताव मिलिंद बांबल यांनी सभागृहात मांडला. त्याला स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर, चेतन पवार, प्रदीप दंदे, हमीद शद्दा, प्रकाश बनसोड, सुजाता झाडे, संजय अग्रवाल, प्रदीप हिवसे , विजय नागपुरे यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव पारित करत असताना भाऊसाहेबांच्या जयंतीदिनाची शासकीय परिपत्रकात नोंद व्हावी, यासाठी शासनास पत्रव्यवहार करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. स्वामी विवेकानंद कॉलनीतील विवेकानंदांच्या पुतळ्याला १२ जानेवारीला महापालिकेकडून हारार्पण करण्यात यावे, अशी सूचना प्रदीप हिवसे यांनी केली. याशिवाय पंचवटी चौकात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख चौक असा फलक लावण्यात यावा,अशी आग्रही मागणी करण्यात आली. या सर्व प्रस्तावाला पिठासीन सभापतींनी हिरवी झेंडी दिली.
निरोपाच्या आमसभेत तुफान फटकेबाजी
By admin | Updated: January 3, 2017 00:17 IST