अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरु पाहणाऱ्या बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती काराखान्याला येत्या जानेवारी महिन्यात शुभारंभ होणार आहे. या कारखान्याच्या पायाभरणीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेने गती घेतली असून ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीसाठी येणारे अडथळे दूर करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाची जबाबदारी पाटणा (बिहार) येथील रेल्वे बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी रेल्वेने मुंबईचे उपअभियंता मोहन नाडगे यांची खास करुन नियुक्ती केली आहे. बडनेऱ्यातील पाचबंगला परिसरात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निर्मिती होत आहे. रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्पात २२५ कोटींची तरतूद केली आहे. मात्र कालांतराने हा प्रकल्प ३०० कोटींच्या घरात पोहचला आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. १५ कोटी ३२ लाख रुपये जमिन अधिग्रहणाचे प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले आहे. १९६ एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. या कारखान्याच्या पायाभरणीला रेल्वे सुरेश प्रभू यांनी यावे, याकरीता खा. आनंदराव अडसूळ हे प्रयत्नरत आहेत.
नव्या वर्षात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचा श्रीगणेशा
By admin | Updated: December 24, 2014 22:53 IST