अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वनखात्याने गठित केलेल्या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे गुप्ता यांना तीन उपसमितीच्या चौकशी नोंदी एकत्र करून वस्तुनिष्ठ अहवाल वनबल प्रमुखांना सादर करावा लागणार आहे. पुढील आठवड्यात समितीची बैठक होईल, अशी माहिती आहे.
राज्याचे वनबल प्रमुख पी. साईप्रसाद यांच्या आदेशाने दीपाली चव्हाण यांना न्याय मिळण्यासाठी ३१ एप्रिल २०२१ रोजी वनखात्याने नऊ सदस्यीय समितीचे गठण केले होते. या समितीला चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता. मात्र, पाच महिन्यांनंतर या समितीचे अध्यक्ष तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव यांनी ३१ ऑगस्ट रोजी एकतर्फी अहवाल सादर करून निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार या दोषी असलेल्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, एम.के. राव यांनी सादर केलेला अहवाल हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचा आक्षेप समितीच्या अन्य सदस्यांनी घेतला आहे. तीन उपसमितीने चौकशीनंतर जो काही वस्तुनिष्ठ दिला, त्या आधारे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा रिपोर्ट वनबल प्रमुख पी. साईप्रसाद यांच्याकडे सोपवावा, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षपदाची धुरा एपीसीसीएफ विकास गुप्ता यांच्याकडे नव्याने साेपविण्यात आली आहे. गुप्ता यांनी समितीच्या अन्य सदस्यांसोबत चर्चा आरंभली आहे. येत्या आठवड्यात समितीच्या सदस्यांची नागपूर येथील वनबल भवनात बैठक होणार आहे. गुप्ता हे यापूर्वी समितीचे सहअध्यक्ष होते, हे विशेष.
----------------
विकास गुप्ता यांची वनखात्यात चांगली प्रतिमा
वनखात्यात नॉन करप्टटेड अशी ख्याती असलेले एपीसीसीएफ विकास गुप्ता यांच्याकडे दीपाली चव्हाण यांना न्याय देण्यासाठी नव्याने अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविली आहे. वनविकास महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, एसीएफ ज्योती पवार, आरएफओ विजया कोकाटे, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक किशोर मिश्रीकोटकर, एपीसीसीएफ प्रवीण चव्हाण यांच्याशी लवकरच संवाद साधून गुप्ता हे अहवाल देतील.
----------------------
श्रीनिवास रेड्डी यांच्या बचावासाठी लॉबी एकवटली
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात वनखाते समितीने अहवाल देऊ नये, यासाठी वनविभागात तेलगंणा, आंध्र पदेश, केरळ, तामिळनाडू येथील आयएफएस लॉबी एकवटली आहे. वनबल भवनात अधिक संख्येने आयएफएस असलेले हे अधिकारी रेड्डी कसे स्वच्छ प्रतिमेचे आहे, हे पटवून देत आहेत. मात्र, आरएफओ दीपाली यांनी रिव्हाॅल्व्हरने गोळी मारून आत्महत्या का केली, याबाबत हे आयएफएस ‘ब्र’देखील उच्चारत नाहीत.