वऱ्हाडेंच्या नियुक्तीने वादंग : जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थताअमरावती : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी ‘ओव्हरटेक’ करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेतली; मात्र त्यांच्या नियुक्तीवरुन जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या नव्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी पुन्हा दुभंगण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात दिसत आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच उलथापालथ झाल्या. अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नवनीत राणा यांना मिळावी यासाठी त्यावेळी आघाडीवर असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आता आ. रवी राणा यांची पक्षातील वाढती ढवळाढवळ नकोशी झाली आहे. सुनील वऱ्हाडे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असताना त्यांचा राष्ट्रवादीशी काडीचाही संबंध नाही. मात्र राणा यांच्या शब्दामुळेच त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. वऱ्हाडे यांना राष्ट्रवादीत घेण्यास विरोध नाही. परंतु त्यांना पक्षात काही दिवस काम करु देणे महत्त्वाचे होते, असे अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वऱ्हाडेंना थेट जिल्हाध्यक्षपद सोपविल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी केवळ ‘सतरंज्या’ उचलण्याचे काम करावे काय? असा सूर निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आहे. यापूर्वी रवी राणांच्या मर्जीनुसार शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नितीन हिवसे यांची वर्णी लावण्यात आली. त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय मान्यही केला; मात्र राणा हे आजही स्वाभिमान संघटनेचेच असल्याचे सांगत असल्याने त्यांचा हस्तक्षेप जुन्या पदाधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
राष्ट्रवादी पुन्हा दुभंगण्याच्या मार्गावर!
By admin | Updated: July 26, 2014 23:52 IST