धामणगाव रेल्वे : ‘रूपलावण्याने मोहरून ऐटीत वावरली मराठी, सिमोलंघन करीत अटकेपार तडपली मराठी, देहू पंढरीच्या स्पर्शाने गोदातीरी धडकली मराठी, चकाकणाऱ्या इंग्रजीच्या कुंपणात अडकली मराठी’ एक हजार वर्षाची परंपरा लाभलेली मराठी मायबोली आपल्या घरातच हाल सोसते आहे़ आज शुद्ध मराठी वाक्य कानावर पडत नाहीत. नव्या लेखकांना ऊर्जा देण्याचे काम सरकार करीत नाही. बालवाडीपासून ते केजी नर्सरीपर्यंत या मायबोलीच्या भाषेत इंग्रजी, हिंदी शब्दांची सरमिसळ होत असल्यामुळे मराठी भाषेला अस्तिवाची लढाई लढावी लागत आहे़
शनिवारी मराठी राजभाषा दिन आहे़ प्रत्येकाने अस्सल मराठी भाषेत बोलावे, आपल्या पाल्यांना मराठी शाळेत प्रवेश द्यावा, ग्रामस्तरापासून तर मंत्रालयातील विशेषत: न्यायव्यवस्थेतही मराठी भाषेचा वापर करून आदेश याच भाषेत काढावे, असे आदेश अनेक वर्षापासून राज्य शासन देत आहे. मात्र, हे आदेश केवळ कागदोपत्री ठरले असल्याची वस्तुस्थिती आहे़ केवळ मराठी भाषा साहित्य संमेलन व काव्यमैफलींच्या मंचावर मराठी भाषेचा वापर होतो. शासन तळमळीने मराठी भाषेसाठी धोरण राबविताना दिसत नाही.
आज मराठीत हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्दांचा शिरकाव झाला आहे़ दहा शब्दांच्या एका मराठी वाक्यात किमान सहा शब्द इंग्रजी असतात. आज कोरोनाच्या काळात निरक्षर लोकांनाही ‘लॉकडाऊन’ शब्द माहीत, मात्र मराठी नाही. शाळकरी मुलांची बोटेही माऊस व की-बोर्डवर सराईतपणे फिरत आहे़ या इंटरनेटच्या महाजालात आगामी अर्ध्या शतकात मराठी कितपत टिकेल, याविषयी चिंता व्यक्त होत आहे. नऊ कोटी लोकांची मातृभाषा असलेल्या महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या मराठी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली आहे़ नोकरी मिळण्यासाठी मराठी विषयात पीएचडी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ परंतु, अनेक प्राध्यापकांकडून अभ्यासक्रमाशी निगडीत वाचन करण्यापलीकडे मराठी भाषेचा भाषिक संर्वधनाच्या पातळीवर अभ्यास होत नाही, ही स्थिती आहे़
कोट
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य अकादमीने त्वरित निर्णय घ्यावा. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे़ या दिवशी साहित्य अकादमीने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा़
- विनायक त्रिपत्तीवार, उपाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ
कोट २
नवोदित लेखकाची ऊर्जा वाढविण्यासाठी त्याच्या पहिल्या पुस्तकासाठी शासनाने अनुदान देणे गरजेचे आहे. त्यावेळी मराठी लेखक अधिक पुढाकार घेतील.
- अंकित ठाकरे, नवोदित लेखक
कोट ३
शाळेत अस्सल मराठी शिकविली तरी विद्यार्थी इंग्रजी भाषेचा वापर करतात. सुंदर व अलंकारिक असलेली मराठी भाषा टिकावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
- साधना कडू, शिक्षिका