अवैध धंद्यातील वैमनस्यातून घडली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:47+5:302021-01-08T04:35:47+5:30

परतवाडा : अचलपुरात अपहरणानंतर अट्टल गुन्हेगाराची झालेली हत्या ही अवैध धंद्यातील वैमनस्यातून घडली आहे. यात दोघा अपहरणकर्त्यांनी त्यास फोन ...

The murder was caused by animosity in illegal trade | अवैध धंद्यातील वैमनस्यातून घडली हत्या

अवैध धंद्यातील वैमनस्यातून घडली हत्या

Next

परतवाडा : अचलपुरात अपहरणानंतर अट्टल गुन्हेगाराची झालेली हत्या ही अवैध धंद्यातील वैमनस्यातून घडली आहे. यात दोघा अपहरणकर्त्यांनी त्यास फोन करून बोलावून घेतले. यानंतर त्याचे अपहरण करून त्याला जिवानिशी मारले. मारल्यानंतर जाळले. जाळल्यानंतर तुकडे केले आणि हे तुकडे पोत्यात भरून त्याची त्यांनी विल्हेवाट लावली.

विल्हेवाट लावताना काही अवशेष अचलपूरमधील सन्यासपेंड लगतच्या बिच्छन नदीत टाकले. काही वझ्झर येथील तलावात, तर काही परतवाडा-बैतूल रोडवर बहिरम अडना नदीच्या पुढे, खोमईनंतर धाबा गावालगतच्या नदी परिसरात टाकले. यातील काही अवशेष परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. या अवशेषांची प्रयोगशाळेकडून डीएनए चाचणी करवून घेत ते अवशेष त्याच मृताचे आहेत, याची खातरजमा पोलीस करून घेणार आहेत.

अपहरण व हत्या करण्यापूर्वी आरोपी सचिन भामोरे (रा. चावलमंडी अचलपूर) आणि सागर सोनोने (रा. माळवेशपुरा अचलपूर) यांनी ३ डिसेंबर २०२० ला परतवाडा-बैतूल रोडवरील द्वारका बार व रेस्टॉरेंटमध्ये लुटमार व दरोडा टाकला होता. यात परतवाडा पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि ३९४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दोन्ही आरोपी कारागृहात आहेत.

दरम्यान, आरोपींनी गोलू ऊर्फ शेख रफीक रा. हिरापूर अचलपूर याला फोन करून दरोड्याच्या दिवशी ३ डिसेंबरला परतवाड्यातील आठवडी बाजारात रात्रीलाच बोलावून घेतले. तेथून ते तिघेही त्याच रात्री अचलपूर शहरातील सन्यासपेंडला पोहोचले. अवैध धंदा आणि गांजा तस्करीची, विक्रीची या तिघांचीही पार्श्वभूमी आहे. तिघांनीही गांजाचे सेवन केले. गांजाच्या नशेतच त्यांच्यात वाद वाढला. शाब्दिक चकमकीतून अवैध धंद्यातील पार्श्वभूमीतून पूर्ववैमनस्य उफाळून आले. यात चाकूही निघाला. रुमाल, दुपट्टाही निघाला आणि नशेतच गोलू उर्फ शेख रफीकची हत्या घडली.

सचिन भामोरे व सागर सोनोने दरोड्याच्या (भादंवि ३९४) गुन्ह्यात कारागृहात असतानाच त्याच्यावर अपहरणाच्या गुन्ह्यात या दोघांच्या चौकशीचा प्रयत्न करताच कपाळावर मारुन घेत कपाळ फोडून घेतले, तर सागर सोनोने याने खडे खाण्याचा प्रयत्न केला. उपचारानंतर सचिनला पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये ताब्यात घेतले. तेव्हा संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. परतवाडा पोलिसांनी भादंवि ३०२ या खुनाच्या कलमासह पुरावा नष्ट करण्याच्या भादंवि २१० अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सागर सोनोनेला कारागृह प्रशासनाने कोविड सेंटरला दाखल केले आहे. तेथून त्याला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्यात परतवाडा पोलीस अटक करणार आहेत.

कुठलाही पुरावा नसताना जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागीरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कैलास गट्टे, अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांनी सुटीवर असतानाही कायदा व सुव्यवस्थेसह शांतता कायम ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. ---------

गोलूची टीपमुळे हत्या?

तेलंगणा पोलिसांना गोलू ऊर्फ शे. रफीकने गांजा तस्करीची माहिती पुरविल्याने सचिन व सागर यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आरोपींनी घटनेच्या दिवशी त्याला नुकसानभरपाई मागितली होती. हा पैसा आणि गांजा विक्री व्यवसातून वाद विकोपाला गेला आणि गोलूच्या हत्येत पर्यावसान झाले, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: The murder was caused by animosity in illegal trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.