दहा जणांनी रचला कट : वनी फाट्यावरील कृष्णा हॉटेलमधील घटनातिवसा : मोझरी येथील अवैध दारू विक्रेता व गावगुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेन्द्र ठाकूरचा शुक्रवारी तिवसा येथील नगरसेवकासह त्याच्या नऊ साथीदारांनी दुपारच्या सुमारास महामार्गावरील वनी फाट्याजवळील कृष्णा हॉटेलवर धारदार शस्त्राने व काचेच्या बाटलीने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.महेंद्र ठाकूरचा अनेक वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात वावर होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने यापूर्वी त्याला तडीपारसुद्धा करण्यात आले होते. महेन्द्र ठाकूर हा काही कामानिमत तिवसा येथे आला असता त्यांच्या अगदी जवळच्या एक सवंगड्या सोबत तो तिवसा नजीकच्या वनी फाट्याजवळील कृष्णा हाँटेलवर गेला होता. याठिकाणी अगोदरच अगोदरच असलेल्या युवकांशी त्याची शाब्दिक बाचाबाची झाली. व वाद विकोपाला गेल्याने महेंद्रला काचेच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वीच यवतमाळ येथील कुख्यात गुंड प्रवीण दिवटे गँगच्या काही गुंंडांनी तिवसा शहरात रात्री दहाच्या सुमारास पेट्रोल पंप चौकात एक दुचाकी जाळुन व एका इसमाला गंभीर मारहाण केल्याची घटना घडली होती. याच घटनेतील वैमनस्यातून महेन्द्राचा काटा काढल्याची चर्चा येथे सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी असलेला संजय ढोबाळे (रा. तिवसा) याने ठाण्यात उशिरा तक्रार दिली. त्यानुसार नगरसेवक किशोर सातपुते व त्याचे साथीदार अमोल पाटील, सोनू लांडगे, राहुल बाभुळकर, सागर वाघमारे, स्वप्निल वानखडे व इतर चार जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हे नोंदविले आहे. पुढील तपास ठाणेदार दिनेश शेळके करीत आहेत. वाढता तणाव लक्षात घेता दंगा नियंत्रक पथक व अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मोझरीच्या गावगुंडाची हत्या
By admin | Updated: January 14, 2017 00:11 IST