महापालिकेत विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी महापालिका सार्वत्रिक निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. पहिला टप्पा म्हणून वार्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या महापालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ अन्वये महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. एक सदस्यीय प्रभाग रचना करताना सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेण्यात येणार आहे. प्रभाग रचना, आरक्षण, सोडतीचा कालावधी विचारात घेऊन निवडणूक घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदार याद्यांवरून एकसदस्यीय वार्डाची रचना करण्यात येणार आहे.
--------------------
अशी असेल निवडणुकीची तयारी
एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करणे
प्रारूप रचना तयार करणे
प्रारूप रचना प्रसिद्ध करणे
आरक्षण जाहीर करणे
आक्षेप मागविणे
आक्षेपावर सुनावणी घेेणे
अंतिम सुनावणी करणे
मतदार यादी प्रसिद्ध करणे
------------------
अशी होईल वाॅर्ड रचना
वार्ड रचना करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरूवात होऊन दक्षिण दिशेकडे शेवट करण्यात येईल. रचना करताना भौगोलिक सलगता ठेवावी लागेल. यात सीमा रेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल आदी नैसर्गिक मर्यादा
विचारात घेऊन निश्चित करावी लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वस्त्यांचे विभाजन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
----------------
येत्या निवडणुकीवर एक नजर...
- एकूण ८७ प्रभाग
- एक सदस्यीय प्रणाली
- २०११ च्या जनगणेवर आधारीत लोकसंख्या
- ६ लाख ४७ हजार ५७ मतदार
- एक प्रभाग साधारणत: ६.५० ते ७ लाखांचा असेल.
--------------------
कोट
एक सदस्यीय प्रणाली निवडणुकीमुळे विकासाला चालना मिळेल. एक असो वा बहुसदस्यीय निवडणूक भाजप सदैव तत्पर आहे. चांगली प्रतिमा आणि प्रतिभावान उमेदवार देणे, त्यांना निवडणूक आणण्यासाठी कार्यरत राहू. मात्र, एक सदस्यीय प्रणालीने अपक्ष सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- तुषार भारतीय, पक्षनेता, भाजप
----------
राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रणालीने निवडणूक घेण्याचे जाहीर केले. मात्र, काँग्रेसने एक वा बहुसदस्यीय प्रणालीची तयारी केली होती. येत्या काळात महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा राहील, यात दुमत नाही.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता, काँग्रेस
--------------
एक सदस्यीय प्रणालीने निवडणूक होत असल्याने सेनेला चांगला वाव मिळेल. सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने याचा महापालिका निवडणुकीत लाभ होईल.
- राजेंद्र तायडे, गटनेता, शिवसेना
---------
एक सदस्यीय प्रणाली असो वा बहुसदस्यीय, बसपासाठी फायद्याची आहे. महापालिकेत बसपाचा महापौर आणि झेंडा कसा फडकेल, याबाबत रणनीती आखली जाणार आहे. बसपाकडे सर्वसमावेशक चांगले उमेदवार असून, त्यांना निवडून आणले जाईल.
- चेतन पवार, गटनेता बसपा