लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसह सर्वसामान्य परिवारातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सत्राचे नियोजन हे आतापासूनच करून मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणाबाबतची सूचना आमदार सुलभा खोडके यांनी केले. २३ मे रोजी मनपाच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहामध्ये त्यांनी महापालिका शिक्षण विभागाचा आढावा घेतला. मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात १४ इंग्रजी माध्यमच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या अनेक सेमी इंग्लिश शाळा या पाचवीनंतर आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमचे शिक्षण हे प्राथमिकपासूनच सुरू करावे यासाठी महापालिकेने बालवाड्यासुध्दा सुरू कराव्यात, असे आ. सुलभा खोडके यांनी सूचित केले. पालिकेच्या शाळांमध्येसुध्दा बोलक्या भिंती, स्मार्टरूम, डिजिटल बोर्ड, संगणक कक्ष, ग्रंथालय, खेळणी साहित्य तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आदींची व्यवस्था होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करावा. येत्या जूनपासून प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक शाळेत आधुनिक व दर्जेदार खेळणी साहित्य देण्याचे नियोजन करावे तसेच शाळेत कवायती, योगा व ॲरोबीक्सचे धडे देण्यासाठी क्रीडा शिक्षक असायला पाहिजे व याची अंमलबजावणी येत्या सत्रापासूनच करावी, नवीन बेंचची व्यवस्था करावी. पटसंख्येनुसार शिक्षक व शिपाई यांची नियुक्ती करावी. महानगरपालिकेत नर्सरी सुरू करून या ठिकाणी मदतनीसची नियुक्ती करावी. अंगणवाडी या शाळेसोबत जोडून देण्यात यावी. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचा युनिफॉर्म देण्यात यावा, अशी सूचनादेखील त्यांनी केली. बैठकीला मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, राकॉंचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, उपायुक्त सुरेश पाटील, व डॉ. सीमा नैताम, प्रभारी शिक्षणाधिकारी अब्दुल राजीक, माजी महापौर किशोर शेळके, प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर उपस्थित होते.