अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने महापालिका आयुक्त आता ॲक्शन मोडवर आले आहे. गुरुवारी त्यांनी शहराच्या चित्रा चौक, इतवारा बाजार, जवाहर गेट, गांधी चौक, राजकमल चौक आदी परिसरात पायदळ दौरा करीत नागरिक व व्यावसायिकांशी संवाद साधला व यादरम्यान विनामास्क आढळून आलेल्यांवर त्यांनी स्वत: दंडात्मक कारवाई केली व त्रिसूत्रीचे महत्त्व पटवून दिले.
इतवारा बाजारातील दुकानदार, ग्राहक, दूधविक्रेता आदींवर आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केली. गांधी चौकातील ऑटोचालक, औषधी दुकानदारांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याची तंबी आयुक्तांनी दिली. या सर्व दुकानदारांशी संवाद साधत त्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी गुरुवारी बाजारपेठेचा आकस्मिक दौरा केला. इतवारा बाजारात नियम मोडणाऱ्या दुकानांत स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली. ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावरही दंड आकारण्याचे निर्देश दिले. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तुंना सूट दिली. याचा अर्थ नियम पाळायचे नाही, असा होत नाही, असे आयुक्त म्हणाले. यावेळी राजकमल चौकात आयुक्तांसोबत विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.