फोटो - मुरकुटे
नगरसेवकांची फिल्टर प्लांटला आकस्मिक भेट, पाईप लीक असल्याचा आक्षेप, रोगराई पसरण्याची भीती, मजीप्रा उठले जनतेच्या जिवावर
अंजनगाव सुर्जी : शहराला आठ दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. यानिमित्त नगर परिषद उपाध्यक्षांच्या नेतृत्वात एका पथकाने फिल्टरेशन प्लांटला आकस्मिक भेट दिली. येथून होत असलेला पाणीपुरवठा हा स्वच्छ असल्याची ग्वाही मुख्य अभियंता विवेक सोळंके यांनी दिली. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जाब विचारण्यासाठी नगरसेवक एकवटले आहेत.
आधीच गेल्या दीड वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना व नागरिकांमध्ये शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना अंजनगाव, दर्यापूर शहरासह तालुक्यातील अनुक्रमे १५६ व ८६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहानूर धरणातून आठ दिवसांपासून अंजनगाव शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात रोगराईचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या तगाद्यामुळे नगर परिषदेचे उपाध्यक्ष सविता बोबडे, जिल्हा नियोजन समिती सदस्या सुनीता मुरकुटे, आरोग्य सभापती अरुणा इंगळे, नगरसेवक सचिन जायदे, कृष्णा गोमासे, सामाजिक कार्यकर्ते आंनद संगई, बंडू हंतोडकर, प्रवीण बोके, सचिन अब्रूक, नीलेश ईखार, गजानन हुरपडे, वैभव खारोडे, देवानंद माकोडे यांनी शहानूर धरणाच्या फिल्टरेशन प्लॉन्टची रविवारी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता विवेक सोळंके, सत्येन पाटील, प्रफुल्ल कांबळे यांच्याशी शहराला होणाऱ्या गढूळ पाण्याबाबत चर्चा करण्यात आली. गढूळ पाण्याचा पुरवठा प्लांटवरून होत नसून, पाईप लाईन ठिकठिकाणी लीक असल्याचे अभियंता सोळंके यांनी सांगितले. सदरचे गंभीर बाबीवर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला असला तरी दुसऱ्या दिवशीही तीच घाणयुक्त पाण्याची समस्या कायम राहिली. याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
------------------
आठ लाईनचा कोट येत आहे.