लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी ऐनवेळी रद्द केलेली परीक्षा आता रविवारी होत आहे. अमरावती शहरात एकूण ३६ केेंद्रांवर या परीक्षा होणार असून, दहा हजार ८३७ परीक्षार्थी असणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर अशी सुरक्षा किट आयोगाकडून पुरविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने एमपीएससी परीक्षांच्या अनुषंगाने जोरदार तयारी चालविली आहे.राज्य सेवा पूर्वपरीक्षा ही केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षांच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे हे परीक्षांची तयारी करीत आहेत. शहरात ३६ शाळा, महाविद्यालयात ही परीक्षा होणार असून, परीक्षार्थींना हॉल तिकीट पोहोचले आहेत. ही परीक्षा दोन सत्रांत होईल. पहिला सत्रात सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ वाजता या दरम्यान परीक्षा घेण्यात येतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार एमपीएससी परीक्षांसाठी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने परीक्षांसाठी कर्तव्यासाठी नियुक्त ११०० कर्मचाऱ्यांची १७ व १८ मार्च असे दोन दिवस कोरोना चाचणी शिबिर आयोजित केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीस प्रारंभएमपीएससी परीक्षांसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची बुधवारपासून कोरोना चाचणी सुरू झाली आहे. ७०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे आरटी-पीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांचे अहवाल शनिवारपर्यंत प्राप्त होतील. परीक्षा केंद्रावर कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना फेशशिल्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर पाऊच पुरविले जाणार आहे.
एमपीएसीसी, रेल्वेची परीक्षा एकाच दिवशीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा २१ मार्च रोजी या एकाच दिवशी होत आहे. एमपीएससीची ऑफलाईन, तर रेल्वेकडून ‘नाॅन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी’ (एनटीपीसी) ही परीक्षादेखील ऑनलाइन केंद्रावर होणार आहे. रेल्वे परीक्षेची तारीख अगोदरच जाहीर झाली आहे.