फोटो पी २६ अंजनगाव
अंजनगाव सुर्जी : पोलीस कर्मचारी व दोन व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासन नामानिराळे होण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. अंजनगावच्या ठाणेदारांविरूद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा थेट सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
ठाणेदार व संबंधित बिट जमादाराविरुद्ध तातडीने गुन्हे नोंदवावेत, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना करू, त्याउपरही गुन्हा न नोंदविल्यास युवा स्वाभिमान रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. खा. राणा यांनी शनिवारी धनेगाव येथे भुयार कुटुंबाची भेट घेतली.
तालुक्यातील धनेगाव येथील अशोक भुयार या संत्रा उत्पादक शेतकऱ्याने बोराळा गणपतीनजीकच्या शेतात आत्महत्या केली होती. संत्रा व्यापारी व पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची आपबिती त्यांनी ना. बच्चू कडू यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केली. दुसऱ्या दिवशी भुयार यांच्या लहान भावाचा हृद्याघाताने मृत्यू झाला. त्यापार्श्वभूमीवर खा. राणा यांनी भुयार कुटुंबाचे सांत्वन केले. अशोक भुयार यांनी मृत्यूपुर्व लिहिलेल्या चिठ्ठीत ठाणेदारांचे नाव आहे, मग त्यांच्याविरूद्ध कारवाई का नाही, असा प्रश्न आपण एसपींना विचारू, भुयार कुटुंबाला सर्वतोपरी शासकीय मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही खासदारांनी दिली.
-------------