चांदूररेल्वे : नगरपरिषदेत घरकुलात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गौतम जवंजाळ यांनी विहिरीत टांगते उपोषण सोमवारपासून सुरु केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट दिली नाही. दिवसभर नगरपरिषद, एसडीओ कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ होती. मात्र वृत्तलिहोस्तर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. नगरपालिकेत आघाडी सरकार असतानाच घरकुल घोटाळा झाल्याचे जवंजाळ यांनी जनतेसमोर आणले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी संबंधित अधिकारी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. मात्र, शासनस्तरावर या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे सादर झाला असतानाही राजकीय दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचा आरोप जवंजाळ यांचा आहे. चांदूर रेल्वे न. प. अंतर्गत येत असलेल्या उर्र्दू शाळेजवळील एका काँग्रेसच्या नगरसेविकेचे पतीने त्यांच्या लेआऊटमधील सार्वजनिक विहिर बुजविली होती. मात्र एकीकडे दुष्काळ असताना विहीर बंद करण्याचा हा घाट जवंजाळ यांनी उधळूून लावला होता आणि याच विहिरीत जवंजाळ यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहे. मंगळवारी अधिकारी दोषींवर कोणतीही कारवाई न करता जिल्हाधिकाऱ्यांंचा आदेशाने वारंवार उपोषण सोडण्यास दबाव आणत होते, असे जवंजाळ म्हणाले.
विहिरीतील टांगते आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु च
By admin | Updated: April 28, 2016 00:14 IST