कामांची पाहणी : राज्याच्या प्रधान सचिवांचे निर्देश अमरावती : राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह शुक्रवारी अमरावती व तिवसा तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेतलेल्या कामांची पाहणी केली. नाला खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे यांसारखी कामे वेगाने करुन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री तसेच मुख्य सचिवांनी संबंधिताना दिले.यावेळी आमदार यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विभागीय कृषी सहसंचालक शु.रा. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे उपस्थित होते. पाहणी दौऱ्यात अमरावती तालुक्यातील डवरगाव, धामणा व सावर्डी तसेच तिवसा तालुक्यातील शेंदोळा येथील कामांची पाहणी करण्यात आली. मौजे डवरगाव येथे रतन इंडिया पावर लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. सुमारे ४७ लाख रुपये खर्च असलेल्या कामांची पाहणी पालकमंत्री तसेच मुख्य सचिवांनी केली. या कामामुळे सुमारे २०० टीसीएम पाणीसाठा होणार असून ५० हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. धामणा येथे १५० मीटर लांब नाल्याचे खोलीकरण होत असून या कामाचा शुभारंभ पालकमंत्री व मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आला. मौजे सावर्डी येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम क्रेडाई अमरावती (कन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया) यांच्या सहभागातून होत असून त्याचा अंदाजे खर्च २५ लाख रुपये आहे. मुख्य सचिवांनी तिवसा तालुक्यातील शेंदोळा येथे सुरु असलेल्या कामांचीही पाहणी केली. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी करताना पालकमंत्री व मुख्य सचिवांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. अभियानांतर्गत होत असलेल्या कामाबद्दल गावकऱ्यांची मते जाणून घेऊन कामे दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे उपअभियंता प्रदीप ढेरे यांनी सुरु असलेल्या कामांबद्दलची तांत्रिक माहिती दिली. यावेळी संबंधित गावातील ग्रामस्थ तसेच महसूल, कृषी, सिंचन आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी आटपा जलशिवारची कामे
By admin | Updated: May 17, 2015 00:49 IST