बसने चिरडले : शाळेत प्रवेश झालाच नाहीअमरावती : वडिलांसोबत शाळा प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्याला एसटीने चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकी वाहनाने जात असता शनिवारी दुपारी १२.३० वाजता गाडगेनगर उड्डाण पुलावर ही घटना घडली. अपघातात मुलगा एसटीच्या चाकाखाली तर वडील बाजूला फेकले गेले. जीत सुनील तायडे (११, रा. स्वावलंबीनगर, कठोरानाका), असे मृत बालकाचे नाव आहे. जीतचे वडील सुनील तायडे यांनाही दुखापत झाली. इयत्ता पाचवीमध्ये ड्रॉ पद्धतीत जीत तायडेचा ज्ञानमाता हायस्कूलमध्ये प्रवेश निश्चित झाला होता. प्रवेशाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी जीत वडिलांसोबत मोपेड वाहनाने निघाला होता. गाडगेनगरातील उड्डाणपुूलावरुन हे पिता-पुत्र जात असताना पुलाच्या वळणावर मागून येणाऱ्या एसटीने त्यांना धक्का दिला. यामुळे दुचाकी वाहनावरुन पिता-पुत्र फेकले गेले.जीत एसटीच्या मागच्या चाकाखाली आला तर वडील सुनील तायडे हे विरूध्द दिशेने फेकले गेले. अपघातानंतर एसटी चालकाने एसटीसह पोबारा केला. जीतच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मेंदूचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. रस्त्यावरून रक्ताचे पाट वाहात होते. घटनास्थळाचे चित्र अंगावर शहारे आणणारे होते. अपघाताचे गांभीर्य लक्षात येताच सुनील तायडे यांनी मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मार्गावरून ये-जा करणाऱ्यांकडे मदतीची याचना केली. परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने एका आॅटोरिक्षा चालकाने रिक्षा थांबवून चिमुकल्याला पित्यासह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. परंतु तेथील डॉक्टरांनी जीतला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार दिगंबर नागे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे हे घटनास्थळी दाखल झाले. जीतचे वडील सुनील तायडे आॅटोरिक्षा चालक आहेत. त्यांना जीत व यश अशी दोन मुुले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या जीतच्या आईचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावलेत. (प्रतिनिधी)
चिमुकल्या ‘जीत’ला मृत्यूने केले पराजित!
By admin | Updated: June 21, 2014 23:45 IST