उपोषणाचा इशारा फळाला :
रिद्धपूर : दिवाळीपूर्वी केलेला काँक्रीट रस्ता अवघ्या २२ दिवसांतच उखडला होता. तो रस्ता तोडून पुन्हा करण्यात यावा तसेच कोलाराई मंदिरासमोरील रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे व मंदिरात जाणारा रस्ता पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यासाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्या इशाऱ्याची दखल घेत येथील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे मंगेश शेळके, पंचायत समिती सर्कलप्रमुख सचिन डवके, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर यांनी उपोषणाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोळंके तसेच उपअभियंता भारत दळवी रिद्धपुरात पोहोचले. अपूर्णावस्थेत असलेली काही कामे सात दिवसांत पूर्ण करण्यात आली, तर बाजार चौक येथील काम दर्जेदार करण्याकरिता जुने काम तोडण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोर्शी अंतर्गत आठ कोटी रुपयांचे काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे.
-----------------------