पत्र प्रताप अडसडांचे, उत्तर अरुण अडसडांना
परतवाडा : मौजा मांजरखेड (कसबा) शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून, त्याचा बंदोबस्त करण्यात यावा. त्या वाघाला तातडीने पकडण्याची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार प्रताप अडसड यांनी मुख्य वनसंरक्षकांसह अमरावती स्थित उपवनसंरक्षकांना दिले.
शेतकऱ्यांना हा वाघ दिसला आहे. यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे शेतात ये-जा बंद झाली आहे. त्यामुळे रबी पिकांचे नुकसान होत आहे. गावकऱ्यांनी ३ मार्चला चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. पण, वनविभागाकडून कोणतीच हालचाल नाही. यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत, असे आमदार प्रताप अडसड यांनी ५ मार्चच्या पत्रात म्हटले आहे.
आमदार प्रताप अडसड यांच्या या पत्राच्या अनुषंगाने मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती यांनी ९ मार्चला उपवनसंरक्षक (प्रा.) अमरावती वनविभाग अमरावती यांना आदेशित केले. पत्राच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून त्याबाबत अनुपालन अहवाल विनाविलंब मुख्य वनसंरक्षकांनी मागविला. हे पत्र आमदार प्रताप अडसडांचे होते. त्यानुसार मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून उत्तर त्यांच्याच नावे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. अमरावती स्थित मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयाकडून पत्राला उत्तर ‘अरुण अडसड, विधानसभा सदस्य’ या नावे पाठविण्यात आले आहे. संदर्भपत्रातही ‘अरुण अडसड, विधानसभा सदस्य’ असे नमूद असून बिबट्याला जेरबंद करण्याचा विषय पत्रात घेण्यात आला आहे.