लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओळखीतील व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून दोघांनी त्याच्या नावावर १५ हजार रुपयांचे ऑनलाईन कर्ज घेतल्याची बाब रेल्वे स्टेशन चौक परिसरातील एका वित्तीय संस्थेत उघड झाली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी मोहन बाबूराव आमटे (३४, रा. रिद्धपूर) यांच्या तक्रारीवरून मुशफिक शहजाद अ. बशीर (रा. राहुलनगर, अमरावती) व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध कलम ४१९, ४२०, ३४ व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. फिर्यादी मोहन आमटे व आरोपी मुशफिक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आमटे यांना पैशाची आवश्यकता असल्याने ते कर्ज काढणार होते व त्याबाबत मुशफिक यास माहीत होते. म्हणून त्याने मोहन यांना कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे सांगितले. आमटे यांच्या आधार कार्ड, पॅन कार्डचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये घालून ते मुशफिकने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठविले. त्यानंतर आरोपींनी आमटे यांच्या संमतीशिवाय एका खासगी बँकेत झिरो बॅलन्सवर त्यांच्या नावाचे अकाउंट ऑनलाईन पद्धतीने उघडले; तसेच मुशफिक व त्याच्या साथीदाराने आमटे यांच्या कागदपत्रांचा आणि मोबाईलवर असलेल्या ओटीपीचा गैरवापर करून बनावट ईमेलच्या आधारे आमटे यांच्या नावे इंडिया बुल्स कंपनीकडून १५ हजार रुपये कर्ज घेतले. ही फसवणूक लक्षात येताच आमटे यांनी १० मे रोजी दुपारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. फसवणुकीचा हा प्रकार ५ डिसेंबर २०२१ रोजी झाल्याचे आमटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.