जरूड : बचत गटांना कर्जपुरवठा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचा वसुलीकरिता तगादा सुरू झाला आहे. बचत गटाच्या सदस्य महिला यामुळे रस्त झाल्या आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.
तालुक्यात अनेक प्रकारच्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पाळेमुळे रोवली आहेत. महिला, पुरुष बचत गटांना कर्जपुरवठा करतात. मात्र, गत एक वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे हातातील कामधंदा सुटला. यामुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. फायनान्स कंपन्यांनी केलेल्या कर्जाच्या वसुलीचा तगादा सुरू असून, त्यांचे वसुली प्रतिनिधी मानहानीकारक बोलत असल्याने अनेकांमध्ये या मायक्रो फायनान्सविषयी चीड निर्माण झाली आहे. एखादेवेळी उद्रेक होण्याची चिन्हे तालुक्यात निर्माण होत आहेत. परंतु, याकडे प्रशासनासह राजकारण्याचेही दुर्लक्ष आहे. या मायक्रो फायनान्स कंपन्यांना कोण आवर घालणार, हा प्रश्न आहे. वारंवार फोन करून धमक्या करणे, रात्री-अपरात्री वसुलीला घरी येणे, यामुळे महिला-पुरुष त्रस्त झाले असल्याने यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.