अनेकांना चावा : संरक्षणाची मागणी
चिखलदरा : वर्षभरापासून पर्यटन नगरीवर लाल तोंडाच्या माकडांनी उच्छाद घातला आहे. घरात घुसून वस्तू पळविणे, उभ्या असलेल्या नागरिकांना पाठीमागून येऊन चावा घेत गंभीर जखमी करणे, या सततच्या घटनांनी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यांच्या बंदोबस्ताची मागणी एका निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी उच्छाद घालत असलेल्या माकडांना पकडून जंगलात सोडण्यात आले. ती माकडे आता चिखलदरा पर्यटन स्थळावरील विविध पॉइंट्सह शहरात धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्या मर्कटलीलांनी पर्यटकांसह नागरिक कमालीचे दहशतीखाली आले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी अनेक निवेदन देऊनसुद्धा व्याघ्र प्रकल्प किंवा वन विभागातर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या माकडांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी फिरोज खान, शेख अजीज, शेख रशीद, शामराव वानखडे, अब्दुल शहीद अब्दुल शकील, हरिभाऊ येवले, शेख कलीम, कैलास हेकडे, शेख सैद्धू, गोपाल खडके, अब्दुल साबीर सिद्दिकी, अब्दुल कलीम सिद्दीकी यांनी केली आहे. वनविभाग, व्याघ्र प्रकल्प व पालिकेने माकडांना पकडून नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
--------