चिखलदरा (अमरावती) : मेळघाटच्या संरक्षित आणि अतिसंरक्षित जंगलात आगी लावण्याचे सत्र सुरूच असून, सोमवारी रात्री पुन्हा व्याघ्र प्रकल्पाच्या पंचबोल खोऱ्यात आग लावण्यात आली. वनकर्मचाऱ्यांच्या महत्प्रयासाने मध्यरात्री ही आग आटोक्यात आली.चिखलदरा-सेमाडोह मार्गावरील प्रसिद्ध पंचबोल पॉइंटच्या खोऱ्यासह, माराबल्डा परिसरात तीन ठिकाणी आग लावल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता लागलेली ही आग विझविण्यासाठी पूर्व मेळघाट वनविभागासह गुगामल वन्यजीव विभागाच्या चिखलदरा परिक्षेत्रातील वनकर्मचारी, अंगारी आणि मजुरांना मध्यरात्री दोनपर्यंत झुंजावे लागले. आग दिसताच वनकर्मचाऱ्यांना सूचना देऊन आग विझविण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी स्थानिक रहिवाशांची आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून या जंगलात रोजच वणवा पेटत असताना आदिवासींकडून वनकर्मचाऱ्यांना कोणतीच मदत मिळत नसल्याचे दिसून येते.आग विझविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाला ब्लोअर मशिन देण्यात आले आहे, तसेच मशिन वन विभागाला मिळाल्यास आगीवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य होईल. सध्यातरी कोणतीच मशनरी नसल्याने झाडांच्या हिरव्या फांद्या घेऊन त्यांच्या साहाय्याने आग विझवली, अशी माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
मेळघाटचे जंगल पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी
By admin | Updated: May 3, 2017 03:42 IST