अमरावती : अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत संधी मिळावी, यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा आदी स्पर्धा परीक्षांसाठी राज्य शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्याक मोफत शिकवणी व संबद्ध योजनेतंर्गत प्रशिक्षणासाठी खासगी संस्थांचा आधार घेतला आहे. ही योजना सात शहरांसाठी राबविली जात असून इयत्ता १० वी १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.अल्पसंख्याक विकास विभागाच्या निर्णयानुसार मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या शहरामध्ये प्रशिक्षणासाठी केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यूपीएससी, एमपीएससी, बँकींग सेवा स्पर्धा परीक्षा आणि सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी प्रशिक्षण देण्यासाठी यापूर्वी शासनाने संस्थांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार प्रशिक्षणासाठी खासगी संस्थांची एक वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. ही योजना अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असल्याने अन्य समूहातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, ही बाब अल्पसंख्याक विभागाचे अवर सचिव अशोक गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे. एकूण उमेदवारांपैकी ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून प्रवेशासाठी उमेदवारांना आॅनलाईन अर्ज करावे लागतील. प्रवेशासाठी अटी, शर्थीचे बंधन असून ते पूर्ण केल्यानंतरच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या समाजातील विद्यार्थ्यांना मिळेल लाभस्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण वर्गासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यात मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्र्चन, शिख, पारसी व ज्यू समाजाचा समावेश असेल. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अपेक्षित आहे. उमेदवारांना निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल.
प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या संस्थांवरच प्रश्नचिन्हअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना यूपीएसी, एमपीएससी, बँकींग सेवा आणि सामाईक प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या खासगी संस्थांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह लागणारे आहे. विद्यार्थ्यांना शासकीय, प्रशासकीय सेवेत संधी मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जात असून त्या दर्जाच्या या संस्था आहेत काय? हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.