अमरावती: मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लढा पुकारणा-या मराठा क्रांती ठोक मार्चाने येथील जिजाऊ चौकात ढोल वाजवून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. शुक्रवारी ११ वाजता पालकमंत्र्यांच्या घराकडे कुच करणा-या मोर्चात सहभागी कार्यकर्त्याना पोलिसांनी जिजाऊ चौक येथे रोखले. त्यामुळे तेथेच ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांसह ५ ढोलवादकांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षणावरील स्थगितीवर त्वरित नवा अध्यादेश काढून रद्द करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने मान्य कराव्यात, सारथी संस्थेला १५०० कोटी रुपये देण्यात यावे, शेतक-यांच्या मालास हमीभाव देण्यात यावा, मराठा समाजाचे स्वतंत्र वसतिगृह मंजूर करावे आदी सकल मराठा समाजाच्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबादास काचोळे,अमृतराज यादव, निलेश पवार, विजय पवार, रोशन अडर्क, सोनाली देशमुख आदीचा समावेश होता.
मराठा क्रांती ठोक मोर्चेकरांनी बडविले ढोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 19:22 IST