अमरावती : सार्वजनिकरीत्या साजरा केला जाणारा कुठलाही सण व उत्सव म्हटला की, प्रसाद, महाप्रसाद वितरण पर्यायाने आलेच. परंतु आता मात्र कुठल्याही मंडळांना प्रसादाचे सहज वितरण करता येणार नाही. यासाठी अन्न व औषधी विभागाचा परवाना घ्यावा लागणार आहे. तत्पूर्वी मंडळांना धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंद केल्यानंतरच प्रसाद वितरणाचा परवाना मिळणार आहे. नवरात्री उत्सवाला गुरूवारपासून सुरुवात झाली. सार्वजनिक मंडळांचा हा उत्सव नऊ दिवसानंतरही सुरू असतो. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परराज्यांमधून येणारा खवा दुग्धजन्य पदार्थ व यामधून होणारी विषबाधा लक्षात घेता अन्न व औषध विभागाद्वारा गणपती उत्सवा पाठोपाठ नवरात्री उत्सवातदेखील प्रसाद वितरणासाठी मंडळांना परवाना काढणे बंधनकारक केले आहे. यासाठी मंडळाला प्रथम धर्मदाय आयुक्ताकडे आपल्या प्रसादाबाबतची नोंदणी करावी लागणार आहे व या कार्यालयाकडून मिळविलेल्या परवान्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभाग परवाना देणार आहे. यासाठी काही शर्ती व अटींचे पालन मंडळांना करावे लागणार आहे. त्यानंतरच ते प्रसाद विक्रीस पात्र राहील. (प्रतिनिधी)
प्रसादासाठी मंडळांना परवाना बंधनकारक
By admin | Updated: September 25, 2014 23:17 IST