अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमितता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगप्रकरणी संबंधित कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाला पोलिसांकडून विचारणा केली जाणार आहे. जिल्हा बँकेने एका कंपनीत सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यात ३.३९ कोटींची अनियमितता झाल्याचा आरोप आहे. शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी त्या व्यवस्थापकाच्या चाैकशीच्या मुद्द्याला दुजोरा दिला आहे.
जिल्हा बँकेने ७०० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक केली. त्यात दलाली द्यायला नको होती. मात्र, ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली दिल्याने बँकेची आर्थिक फसवणूक झाली, अशी तक्रार शहर कोतवाली पोलिसांत नोंदविण्यात आली. प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले. त्यात बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात त्या व्यवस्थापकाचादेखील समावेश आहे.
दरम्यान, याप्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह माजी अध्यक्षद्वयांना सक्तवसुली संचालनालयाकडून हजर राहण्याबाबत समन्स जारी करण्यात आले. त्याअनुषंगाने बँकेशी संबंधित दोघांसह कंपनीच्या व्यवस्थापकाचा कथित संवाद असणाऱ्यांच्या संभाषणाच्या पाच रेकॉर्डिंग यूट्युबवर व्हायरल झाल्या. त्या अनुषंगाने त्यांची पोलिसांकडून विचारणा केली जाणार आहे. याप्रकरणी ज्यावेळी मोंगा यांना जबाब नोंदविण्यात आला, त्यावेळी त्यांनी अशा कठल्याही संभाषणाबाबत पोलिसांना सांगितलेले नव्हते. त्यामुळे ‘व्हायरल’ रेकॉर्डिंगची सत्यता पडताळण्यासाठी त्यांना विचारणा केली जाईल, गरज पडल्यास त्या रेकॉर्डिंगची फॉरेन्सिक तपासणीदेखील केली जाणार असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली. ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘व्हायरल’ रेकॉर्डिंगने खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे.
////
कोट
ती ऑडिओ क्लिप बनावट आहे. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने विरोधकांनी केलेले ते षडयंत्र आहे. त्या प्रकरणाशी आपला सुतराम संबंध नाही. त्यांच्या या कटाला मतदार भीक घालणार नाहीत.
- बबलू देशमुख, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक