लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चाकूच्या धाक दाखवून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.पोलीस सूत्रानुसार, शुभम प्रवीण जोशी (२२, रा. भीमनगर) व अक्षय भगवंत कोरे (२१, रा. डोमक, ता. चांदूर बाजार) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, दुचाकी व चाकू असा एकूण ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रेखा विजय आठवले (४३, कमळापूर, ता. मोर्शी) ही महिला ९ नोव्हेंबर रोजी रहाटगाव स्थित डेबुजीनगरात बहिणीच्या भेटीसाठी गेली होती. गावी जाण्यासाठी पायी रहाटगावकडे निघाल्या असताना दुचाकीवर आलेले शुभम व अक्षयने अडविले. चाकूच्या धाकावर सोन्याचे मंगळसूत्र व रोख हिसकावून त्यांनी पळ काढला. नांदगाव पेठ पोलिसांसह गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला. वेलकम टी-पॉइंट परिसरात नाकाबंदी करून पळून जाण्याच्या बेतात असलेले शुभम व अक्षय यांना अटक करण्यात आली. त्याच्या अंगझडतीनंतर मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, विजय पेठे, विनय मोहोड, दीपक दुबे, अजय मिश्रा, उमेश कापडे, इम्रान सय्यद, पवन घोम, गजानन सातंगे आदींच्या पथकाने केली.
चाकूच्या धाकावर मंगळसूत्र चोरणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST