बच्चू कडू : विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना, नुकसानग्रस्त भागाची पाहणी
चांदूर बाजार : तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस, गारपीटने तालुक्यातील शेकडो एकर शेतातील पीक बाधित झाले. त्या नुकसानाची पाहणी करायला राज्यमंत्री बच्चू कडू विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश राज्यमंत्री कडू यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यातील वणी, बेलखेडा, सायखेडा, आलमपूर, बोदड, शिरजगाव कसबा आदी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटमुळे झाडावरील आंबिया बहर गळून पडला. गहू, कांदा यासह भाजीपाला जागीच जमीनदोस्त झाला. राज्यमंत्री कडू यांनी आलमपूर येथील शेतकरी चक्रधर चौधरी यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या संत्राझाडांची पाहणी केली. यावेळी विमा कंपनीचे विनायक गुल्हाने व रोशन देशमुख, पुष्पक खापरे, पंचायत समितीचे सभापती वनमाला गणेशकर, पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले, राजेश सोलवसह तालुका कृषी सहायक, तलाठी व शेतकरी उपस्थित होते.
---------------