अनधिकृत बांधकाम प्रकरण : महापालिका कारवाईला चपराकअमरावती : स्थानिक कॅम्प परिसरातील हॉटेल महेफिल इन व ग्रँड महेफिलमध्ये ५० हजार चौरस फूट असलेल्या अनधिकृत बांधकामास राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने स्थगनादेश दिला आहे. सदर स्थगनादेश महापालिकेत धडकला असून दंडात्मक कारवाई, अनधिकृत बांधकाम हटविण्याला तूर्तास लगाम बसला आहे. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ‘महेफिल’चे अनधिकृत बांधकाम व लॉनचे मोजमाप केले होते. त्यानुसार हॉटेल महेफिल इनचे २३ हजार चौरस फूट तर ग्रँड महेफिलचे २७ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम असल्याचे मोजणीनंतर स्पष्ट झाले होते. मोजणीनंतर अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावून हॉटेल संचालकांना १.२५ कोटी रुपये भरण्याची ताकिद दिली होती. मात्र ही रक्कम फार जास्त होत असल्याचे कारण पुढे करुन ‘महेफिल’च्या संचालकांनी आयुक्तांकडे सुनावणीत दाद मागतिली होती. परंतु अनधिकृत बांधकाम प्रकरणी ‘नो कन्फ्रोमाईस’ अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. त्यानंतर महेफिलच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयात हे प्रकरण टिकणार नाही, ही जाणीव ‘महेफिल’च्या संचालकांना झाल्यामुळे त्यांनी महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या विरोधात नगरविकास मंत्रालयात धाव घेतली. त्याअनुषंगाने नगरविकास विभागाने स्थगनादेश देताना महापालिका प्रशासनाने केलेल्या एकुणच कारवाईला पुढील आदेशापर्यंत लगाम लावला आहे. परिणामी ‘महेफिल’चे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची तयारी महापालिकेने चालविली असता आता या मनसुब्यावर पाणी फेरले आहे, हे विशेष. (प्रतिनिधी)
‘महेफिल’ला नगरविकास मंत्रालयातून स्थगनादेश
By admin | Updated: October 17, 2015 00:20 IST