अमरावती : ढगफुटी व अतिवृष्टीमुळे दरड कोसल्यामुळे, महाराष्ट्रात व अमरावती जिल्हयात शेती,पशुधन व घरांचे प्रंचड नुकसान झाले. अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले. सबब, तातडीने पंचनामे करून केंद्रातर्फे भरीव सहकार्य करावे, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचेकडे केली आहे. नवी दिल्लीत त्यांनी मंत्र्यांची भेट घेतली. रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक व कमी शेती असलेल्या शेतकऱयांचा समावेश करून त्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. ढगफुटी व अतिवृष्टीने नुकसानग्रस्त अमरावती जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दिल्ली गेले. ना. नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या भयावह व दुर्दैवी परिस्थितीची जाणीव करून दिली. जनतेला दिलासा द्यावा,या नैसर्गिक आपत्तीतुन जनतेला सावरण्यास मदत करावी अशी मागणी केली. सोबतच ज्यांची गुरेढोरे वाहून गेली अश्या पशुधन मालकांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे परंतु पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत अश्या पीकविमा कंपन्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.
महाराष्ट्राची व्यथा केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या पुढ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST