एफडीआयने मागविला अहवाल : पाच दिवसांनंतर सुरु होणार कारवाईअमरावती : मॅगी नुडल्स परत कंपनीला पाठविण्यासाठी शहरातील विक्रेत्यांना अन्न व औषधी प्रशासनाने नोटीस बजावली आहे. पाच दिवसांमध्ये मॅगी नुडल्सच्या मालाचा अहवाल एफडीआयने मागविला असून त्यानंतर डिलरकडे मॅगी नुडल्स आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मॅगी नुडल्स हे आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेक राज्यांत तपासणीदरम्यान सिध्द झाले आहे. महाराष्ट्रतही मॅगी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्येही आरोग्याला घातक असणारे पदार्थ आढळून आले. त्यामुळे राज्यात मॅगी नुडल्सवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी लागू होण्यापूर्वी शहरात लाखो पाकिटांचा माल सबंधित डिलर व किरकोळ विके्रत्यांनी खरेदी करून ठेवला आहे. शहरात मॅगी नुडल्स विक्री करणारे दोन डिलर असून त्यांच्यामार्फत विविध विक्रेत्यांना मॅगी नुडल्सची विक्री करण्यात आली. शहरात दररोज १० हजार मॅगीचे पॅकेट विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅगी नुडल्सचा साठा आजही घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे साठून आहे. मॅगी नुडल्स घातक असल्याचे नागरिकांना समजताच अनेकांनी मॅगी नुडल्स खाणेच बंद केले आहेत. मात्र, तरीसुध्दा काही किरकोळ प्रमाणात मॅगीची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अमरावती शहरात मॅगीचा खप अचानक ठप्प आहे. हा सर्व माल कंपनीला परत पाठविण्यात येणार आहे. तशा सुचना कंपनीकडून व्यापाऱ्यांना मिळाला आहेत. शासनाकडून अन्न व औषधी प्रशासनाला मॅगी नुडल्सवर बंदी घालण्याचे आदेश मिळाले आहे.शासनाच्या निर्देशाप्रमाणे मॅगी नुडल्स विक्रेत्यांना माल परत पाठविण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विक्रेत्यांजवळील मॅगी नुडल्स स्टॉकचा अहवाल मागविण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांनंतर विक्री सुरु असल्याचे आढळून आल्यास विके्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. - मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)
मॅगी नुडल्स परत पाठविण्यासाठी विक्रेत्यांना नोटीस
By admin | Updated: June 7, 2015 00:32 IST