शेतकरी त्रस्त : अनेकांची विद्युत उपकरणे जळालीवरूड : तालुक्यात शेतकऱ्यांना विद्युत कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युतपंप जळत आहेत. या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहत. त्यातच लोडशेडींगच्या नावाखाली विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्याने ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. खरिपाबरोबर रबी पीक व संत्रा बहर हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. महावितरणाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. भारनियमनात शेतकऱ्यांना विद्युत पंपासाठी दररोज सहा तासच वीज पुरवठा केला जातो. आठवड्यातून एक दिवस पूर्णत: २४ तास विद्युत पुरवठा बंद असतो. उर्वरित सहा दिवसात रोज केवळ सहा तास शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळते. यातील तीन दिवस व उर्वरित तीन दिवस रात्री दीड वाजल्यानंतर विजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सहा दिवसांत फक्त २४ तास वीज मिळते. आठवड्याला मिळणाऱ्या या २४ तास विजेपैैैकी सर्व दुरपर्यंत चार तास या ना त्या कारणाने वीजपुरवठा बंद असतो. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २० तासच विद्युत पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. हा वीजपुरवठादेखील अत्यंत कमी दाबाने होतो. या कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांची विहिवरील विद्युत उपकरणे सुरूच होत नाहीत. त्यामुळे विद्युत संच जळून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुरूस्तीचा पाच ते आठ हजारांचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. खरीप हंगामातील सोयाबीन पीक पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. कापूस व संत्रा पिकांवर शेतकऱ्यांच्या थोड्याफार आशा आहे. परंतु महावितरणाने शेतकऱ्यांच्या या आशेवरही पाणी फेरल्याचे चित्र दिसत आहे. सोयाबीनमुळे खचलेला शेतकरी रबी पिकाचे नियोजन करीत आहे. अशावेळी विजेअभावी पाणी मिळत नसल्याने रबीचे पीकही हातचे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रेकडाऊनच्या नावाखाली दिवसाच्यावेळी तासनतास विजपुरवठा खंडित केला जातो. वीज कंपनीने वेळीच या समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरुडात कमी दाबाचा विद्युत पुरवठा
By admin | Updated: November 15, 2015 00:13 IST